नांदेड जिल्हा हा गोदावरी नदीच्या काठी वसलेला आहे. "नांदेड" या नावाचा उगम "नंदी-तट" या शब्दामधून झालेला असून, "नंदी" म्हणजे भगवान श्री शंकराचे वाहन आहे आणि "तट" म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ, नंदीने गोदावरी नदीच्या किनार-यावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरु श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांनी सन १७०५ मध्ये या ठिकाणी आपला देह ठेवला.
नांदेड जिल्ह्यात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत यामध्ये प्रामुख्याने सचखंड गुरुद्वारा, कंधारचा किल्ला, काळेश्वर मंदिर यांचा समावेश होते तसेच नांदेड जवळ माहूर गड, सहस्त्रकुंड धबधबा, विष्णुपूरी कालवा आणि उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे असे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
काळेश्वर येथे प्राचीन असे शिवमंदिर आहे. गावाच्या नावावरून यास काळेश्वर मंदिर असे नांव पडले आहे. हे प्राचीन शिवमंदिर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे तसेच श्रावण महिन्यात येथे अनेक कार्यक्रम होतात.
हे मंदिर नदिकाठी असल्यामुळे येथे बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. नांदेड येथील अनेक शाळा येथे दर्शन आणि सहलीसाठी येतात.
हुजूरसाहिब गुरुद्वारा हा शीखांचे दहावे गुरु गोबिंद सिंह यांसाठी प्रसिद्ध आहे. गुरु गोबिंद सिंहानी शेवटचा श्वास येथेच घेतला होता. १८३२ ते १८३७ या काळात महाराजा रणजितसिंग यांनी हा गुरुद्वारा निर्माण केला आहे.
२००८ साली गुरु गोबिंद सिंह यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाला त्यावेळील भारताचे पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी त्यावेळी देश-विदेशातून अनेक लोकही आले होते. लेजर शो हे येथील प्रमुख आकर्षण आहे यामध्ये शिखांच्या दहा गुरूंचे जीवन सुंदर अशा स्वरुपात वर्णन केले आहे.
कंधार येथे अतिप्राचीन असा भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला राष्ट्रकुट घराण्यातील कृष्ण राजा तिसरा याने बांधला आहे. हा किल्ला पूर्णपणे पाण्यात आहे.