या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता
नमतस्ये नमतस्ये नमतस्ये नमो नम:
सर्व चराचर विश्व ओंकारापासून उत्पन्न झाले, असे आपले सर्व वैदिक ऋशी एकमुखाने म्हणतात . या ऋषींनी या विश्वात जेथून जेथून शक्तीचा उगम होतो त्याला त्याला देवता मानलेल्या आहेत . सर्व देवता आदिशक्तीच्या मूळ स्वरूपातून निघाल्या आहेत. या संबंधीची एक कथा प्रसिद्ध आहे. ब्रह्माचा मानसपुत्र दक्ष याने घोर तपश्चर्या करून जगदंबीकेला प्रसन्न केले आणि वर मागितला , "तू माझी कन्या होऊन जन्म घे" त्याप्रमाणे दक्षाची पत्नी प्रसूता हिला कन्यारत्न प्राप्त झाले. दक्षाने तिचे नाव सती असे ठेवले. लहानपणापासून सती शिवपूजेत मग्न राहू लागली . ती लग्नायोग्य झाल्यावर दक्षाने स्वयंवर आयोजीत केले. त्याने सर्व देव, दानव , यक्ष , किन्नर ,गंधर्व , ऋषीमुनींना निमंत्रण पाठवले पण शंकराला तो स्मशानवासी म्हणून त्यास निमंत्रण पाठवले नाही. जेंव्हा सती मंडपात आली तेंव्हा तिला शिवशंकर कुठेही दिसला नाही त्यामुळे तिने 'शिवाय नम:' म्हणून भूमीला हार अर्पण केला आणि काय आश्चर्य त्या ठिकाणी सतीने ठेवलेल्या हार गळ्यात घालून शंकर प्रकट झाले आणि नंतर अंतर्धान पावले. त्यानंतर काही काळाने दक्षाने सतीचा विवाह शंकराशी लावून दिला. काही काळाने दक्ष प्रजापाती बनला आणि त्याचा त्याला गर्व चढला तो शंकराचीही निंदा करू लागला. काही काळाने दक्षाने एका महायज्ञाचे आयोजन केले आणि शिवशंकराला सोडून सगळ्यांना आमंत्रण दिले.जेंव्हा सतीने शिवशंकराला यज्ञाला जाण्याची विनंती केली तेंव्हा शंकराने निमंत्रण नसल्यामुळे जाण्याचे नाकारले आणि सातीलाही जाण्याची परवानगी दिली नाही. शिवशंकर जाण्याची परवानगी देत नाही हे लक्षात आल्यावर सतीने दहामहाविद्यांचे रूप धारण केले तिचे ते उग्ररूप पाहून घाबरलेल्या शिवाने तिला जाण्याची परवानगी दिली.
सती आपुलकीच्या भावनेने यज्ञमंडपात गेली पण तिथे दक्षाने आणि मदांध बहिणींनी तिची आणि शंकराची निंदानालस्ती केली. हा अपमान सतीला सहन झाला नाही आणि तिने तात्काळ याज्ञाकुंडात उडी घेतली आणि देहाच दहन केलं. हे शंकराला समजताच त्याचा क्रोध अनावर झाला त्याने आपल्या शिवगणांना आज्ञा केली, ' दक्ष्याचा यज्ञाचा नाश करून त्याचे मुंडके तोडून यज्ञकुंडात टाका'. हे सर्व झाल्यावर उदास आणि उदिग्न झालेल्या शंकराने सतीचे जळालेले शव खांद्यावर घेतले आणि दिगांबर अवस्थेत त्रैलोक्यात संचार करू लागला. शंकराचा हा उन्मत्तावस्थेतील संचार थांबावा म्हणून विष्णूने सतीच्या कलेवराचे तुकडे तुकडे केले. त्यातील ५१ तुकडे पृथ्वीवर जेथे जेथे पडले त्या त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ निर्माण झाले. सुदर्शन चक्राने सतीच्या कालेवारचे जरी ५१ मुख्य तुकड्यात विभाजन झाले असले तरी तिच्या शरीराचे अणू, परमाणू आकाराचे असंख्य] तुकडे आजही वायु मंडळात तरंगत आहे आणि त्यांपैकी एक प्रकटीकरनाचा भाग म्हणून मनुष्यरुपातील रत्नेश्वरी असे मातेच रूप आहे.
इ.स. ११ ते १४ वे शतक याला "यादव कालखंड" म्हणतात. कारण या काळात रत्नेश्वरी डोंगरावर यादव राजांनी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला. हा डोंगरमाथा वडेपुरी या गावापासून साधरण दोन किलोमिटर अंतरावर आहे . विस्तीर्ण भूप्रदेश आणि मध्ये उंच डोंगर अशी डोंगर टेकडीची रचना आहे.
यांच सुमारास वडेपुरी गावात महत्वाची घटना घडली. येथील रहिवाशी नारायण माळी हा अत्यंत कष्टाळू शेतकरी होता. तो आणि त्याची पत्नी लक्ष्मी शेतात राबत असत. दोघेही अत्यंत धार्मिक होते , लक्ष्मी तर देवीची निस्सीम भक्त होती ती नवरात्रात नऊ दिवस कडक उपवास करत असे. लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी त्यांना अजून मुलबाळ झाले नव्हते. याच सुमारास माता रत्नेश्वरीने लक्ष्मी-नारायणाच्या पोटी जन्म घ्यायचे ठरवले. देवीच्या कृपेने लक्ष्मी गरोदर राहिली आणि तिला तेजस्वी असे कन्यारत्न प्राप्त झाले. जन्मत:च बालकाच्या चेहऱ्याभोवती असलेले प्रकाशचे तेजोवलय पाहून सर्वाना हे कळून चुकले की हे बाळ सामान्य नाही. सारा गांव ते दिव्य बालक पाहण्यासाठी गर्दी करू लागले. मुलीचा नामकरण सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. रत्नासारखी दिसते म्हणून "रत्ना" . सर्वाना हे नाव फार आवडलं.दोघही आता आनंदात राहू लागले. नारायणचा मळा बहरून आला होता उंच उंच झाडे , विविध प्रकारची फुलझाडे , फळझाडे, तसेच अनेक प्रकारच्या भाज्या नारायणच्या मळ्यात होत्या. "रत्ना" आता बसायला लागली होती निरनिराळ्या वस्तूशी ती खेळू लागली होती. एके दिवशी लक्ष्मी रत्नाला घेऊन मळ्यात गेली . तिला पोत्यावर टाकून लक्ष्मी चमकुरा काढण्यासाठी मढीत उतरली तेवढ्यात एक भलामोठा नाग रत्नाच्या जवळ आला. नागाने तिला ओळखले आणि तिच्या भोवती तीन प्रदक्षिणा घालून तिच्या समोर बसला आणि फना काढून डोलू लागला. आजच्या भेटीने दोघानाही खूप आनंद झाला. तेवढ्यात लक्ष्मी चामकुरा काढून तिथे आली ते दृश्य पाहून जागेवरच थबकली तिच्या तोंडून आवाजही निघेनासा झाला. नागाने रत्नाला फणा काढून त्रिवार वंदन केले, रत्नाने हसतच आपला उजवा हात आशीर्वादासाठी उचलला आणि क्षणांत नाग अदृश्य झाला. ही घटना गावभर पसरली आणि लोकांची घरी येण्याची रीघ सुरु झाली. गावातील वयस्क बायका म्हणू लागल्या "ही पोरगी साधीसुधी नाही,देवीनेच इच्या पोटी जन्म घेतला असणार".
इकडे देवगिरीच्या यादवांनी डोंगरी किल्ला बांधण्यासाठी वडेपुरीपासुन जवळच एक विस्तीर्ण टेकडी निवडली आणि किल्ला बांधण्याचे काम सुरु झाले, जवळच किल्लासाठी आवश्यक असलेल्या दगडाची खाण झरी या गावाजवळ सापडली किल्याचे बांधकाम सुरु होऊन पाच वर्षे उलटून गेली, रत्ना आता सहा वर्ष्याच्यावर झाली होती आता ती बोलू लागली होती, मात्रीनिसोबत खेळू लागली. एकदा असाच खेळ रंगात आला होता खेळता खेळता तिची मैत्रीण राजाई विहिराकडे पळाली आणि तोल जाऊन विहिरीत पडली, ते पाहून मुली आरडाओरडा करू लागल्या गावातील माणसे विहिरीजवळ जमा होऊ लागली आणि आश्चर्य म्हणजे राजाई विहिरीत तरंगू लागली होती. जेंव्हा लोकांनी राजाईला पाण्याबाहेर काढले तेंव्हा लोकांनी राजाईला विचारले 'तुला भीती वाटली नाही का?' तेंव्हा ती म्हणाली 'मला कोणीतरी वर उचलून धरले होते आणि ते हात रत्नाचे होते '. अशाप्रकारे देवीच्या रुपात रत्ना लोकांची मदत करत होती. गडाचे कामही चालू होते तिथे काम करण्याऱ्या लोकांकडून रत्नाने एक सुंदर महादेवाची छोटी पिंड तयार करून घेतली आणि डोंगराच्या शेवटी एक सपाट जागा बघून त्या पिंडीची प्रतिस्थापना केली आणि श्रावणमासात दररोज पुजेला येण्याचा संकल्प केला.
रत्नाला आता एकटे एकटे वाटू लागले होते आणि नारायणालासुद्धा आपल्या मुलीचं लग्न व्हावं असे वाटू लागले होते. गडाचे कामकाज बघण्यासाठी असाच एक यादवांचा सरदार 'शम्भुनाथ माळी' तिथे आला होता नारायणचा मळा बघून तो नारायणाकडे गेला, दोघांत बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या नारायणाने सरदाराची संपूर्ण माहिती घेतली आणि रत्नासाठी हाच योग्य वर आहे असा विचार त्याच्या मनात चालू लागला. काही दिवसानंतर नारायण शंभूनाथांच्या वडिलांकडे लग्नाचे बोलण्याविशई गेला. शंभूनाथांशी कशी ओळख झाली ते सांगितले आणि बोलता बोलता लग्नाचा विषय काढला. शंभूनाथाचेही वडील शंभूच्या लग्नाच्या विचारात होते ते म्हणाले 'आज रात्रीच शंभूनाथाला विचारतो आणि कळवतो'. नारायणनेही हि गोष्ठ लक्ष्मीला सांगितली, आता दोघेही निरोपाची वाट पाहू लागले. इकडे वडिलांनी शंभूनाथाला लग्नासाठी विचारले त्यानेही रत्नाला पहिले होते आणि त्याला ती आवडली होती त्याने लगेच होकार दिला. काही दिवसातच लग्नाची तयारी चालू झाली. सारा गांव नारायण माळ्याच्या मदतीला धावला वैशाख मासातील शेवटच्या आठवड्यातील मुहूर्त काढला. दोन एकर जागेवर भव्य मंडप उभारला सुंदर सजावट केली , वाजंत्री वाजू लागली. अखेर लग्नाचा दिवस उजाडला, सगळे पाहुणे आपआपल्या जागेवर स्थानापन्न झाले. लग्न लागले, टाळ्यांच्या कडकडाटात वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार अर्पण केले. लग्नानंतर होणारे सर्व सोहळे म्हणजे सप्तपदी,साडे,सुनमुख हे सर्व आटोपले आणि सर्वांनी दाटलेल्या कंठाने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी रत्नाला निरोप दिला.
रत्ना आता सासरी सासु-सासऱ्याच्या सहवासात आनंदाने राहू लागली. वैशाख संपला, जेष्ठ, आषाढ संपून श्रावण मासास आरंभ झाला. श्रावण सुरु होताच रत्नाला तिच्या संकल्पाची आठवण झाली. महिनाभर डोंगरावर स्थापन केलेल्या शंकराची पुजाअर्चा करायची होती. रत्ना भाल्यापाहाटे उठली, डोंगरावर जाताच तिने सरोवरात स्नान केले शंभूमहादेवाची मनोभावे पुजा केली आणि घरात कोणीही जागे व्हायच्या आत ती घरी परतली.असा हा क्रम दररोज चालू होता. श्रावणाचा शेवटचा दिवस आणि तोही सोमवार होता. अधले दिवशी सासूला जग आली त्यावेळी रत्ना घरात न्हवती. रोजच्याप्रमाणे रत्ना परत आली पण सासूने तिला काही विचारले नाही. हा सर्वप्रकार सासूने शंभूनाथ्याच्या कानावर घातला आणि त्याने या गोष्टीचा छडा लावण्याच्या निश्चय केला. आज श्रावणाचा शेवटचा दिवस आणि तोही सोमवार असल्यामुळे रत्नाने पूजेचे साहित्य रात्रीच तयार करून ठेवले होते. रोजच्याप्रमाणे रत्ना बाहेर पडली आणि शंभूही तिच्या पाठोपाठ बाहेर पडला. दोघेही डोंगराच्या दिशेने चालू लागले पावसाळ्याचे दिवस,श्रावणमास,अंधार दाटलेला आणि केवळ एक पाऊलवाट . शंभूनाथाच्या मनात अनेक शंखा येऊ लागल्या होत्या 'एवढया रात्री हि बाहेर कुठे जाते, सुंदर रूपातील हि हडळ तर नाही हि हडळ जिवंत ठेवता कामा नये'. असा मनाचा निर्धार करून त्याने तलवार बाहेर काढली आणि झपाझप पावले टाकीत तो निघाला. रत्नाच्याही लक्षात आले आपला कोणीतरी पाठलाग करीत आहे. शंभूनाथ तलवार घेऊन रत्नाच्या अगदी जवळ आला. रत्नाने धरणीमातेचा धावा केला " माते मला पोटात घे ".तेवढ्यात ढगांचा कडकडाट झाला शंभू रत्नाच्या अगदी जवळ आला तिच्या मानेला पकडून तिची मान छाटण्याचा पवित्रा त्याने घेतला आणि तेवढ्यात विजेचा एक प्रचंड लोळ खाली आला. त्याचा स्पर्श रत्नाच्या डोक्याला झाला त्याच बरोबर रत्नाचे शिळेत रुपांतर झाले, धरणीमातेने रत्नाला तिच्या गळ्यापर्यंत आपल्या पोटात सामावून घेतले पण तिचा चेहरा वर असतानाच शंभूनाथाचा तिला स्पर्श झाला आणि तिचे शिळेत रूपांतर झाले.
या साऱ्या घटनेने शंभूनाथ चक्रावून गेला क्षणभर त्याला काही सुचले नाही. आपली पत्नी स्त्री नसून ती दैवी होती हे त्याला कळून चुकले त्याचअवस्तेत तो छावणीत आला. शंभूनाथाने सैनिकाला हाक मारली आणि एक निरोप दिला कि "ताबडतोब माझ्या आई-वडिलांना इकडे घेऊन ये". सैनिक आज्ञा घेऊन निघाला. इकडे शंभूनाथाला तातडीने मोहिमेवर जाण्याची आज्ञा झाली. आणि मोहिमेवर असतानाच शंभूनाथाला विर-मरण प्राप्त झाले. इकडे रत्नाचे काय झाले हे गूढच राहिले सगळ्यांनी रत्नाचा खूप शोध घेतला पण काही उपयोग झाला नाही. साऱ्या गावावर उदासीनतेची छाया पसरली. या घटनेला नऊ महिने होऊन गेले. यादावराजांचे पंतप्रधान हेमाद्रिपंत बांधकामाचा मुहूर्त साधण्यासाठी डोंगरावर आले आणि जागेची पाहणी करू लागले. बरेच फिरून झाल्यावर एका शिळेवर आरामशीर बसले आणि बसल्या ठिकाणी त्यांना डुलकी लागली. डुलकीच्या तंद्रीत त्यांना दृस्तांत झाला. प्रथम एक भला मोठा प्रकाशझोत नजरेसमोर आला आणि त्यातून एक अष्ठभुजा देवी प्रगटली. देवीने सर्व ईतिहास हेमाद्रीपंताना सांगितला 'कसे नारायण मळ्याची कन्या रत्ना म्हणून जन्म घेतला,कसा विवाह झाला आणि श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी मी या ठिकाणी माझे लौकिक जीवन संपवून शिलेच्या रुपात प्रकट झाले'.आता या ठिकाणी मंदिर बांधून किल्ल्याचे बांधकाम सुरु कर. मंदिरासमोर भव्य कुंड खोद. त्यात येणार पाणी हे अतिशय पवित्र असेल त्या पाण्यापासून लोकांच्या असंख्य व्याधी दूर होतील. काही वेळाने हेमाद्रीपंथ जागे झाले आणि जागे होताच सर्व सैनिकांना बोलावून सर्व परिसर स्वच्छ करण्यास सांगितले. जागा स्वच्छ करत असतानाच एका झुडपात देवीचा सुंदर चेहरा असलेली शीळा सापडली. आता दृसठांतात पाहिलेला चेहरा आणि शिळेवर असलेले चेहरा एकच असल्याचे पंताना जाणवले. झालेला सर्व प्रकार त्यांनी लोकांनी सांगितला. लोकही या सर्वप्रकाराने अचंबीत झाले आणि देवीच्या दर्शनासाठी डोंगरकडे जाऊ लागले पण मंदिराचे काम पूर्ण होई पर्यंत कोणालाही देवीचे दर्शन होऊ दिले नाही.
आठ दिवसात मंदिराचे काम पूर्ण होत आले होते समोरचा कुंडही तयार होत आला होता पण त्यात पाण्याचा एकही थेंब आला नाही. हेमाद्रीपंतानी मातेची मनोमन प्राथर्ना केली आणि या संकटातून सोडवण्याची विनंती केली. सर्व जन आप-आपल्या मुक्कामी पोहोचले, आता परिसरात कोणीही नव्हते.सारा परिसर निर्मनुष्य झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास हातात त्रिशूळ घेतलेली देवी त्या कुंडाजवळ प्रकटली आणि कुंडाच्या पश्चिम भिंतीत तळाशी मध्यभागी तो त्रिशूळ फेकला. ज्या ठिकाणी त्रिशूळ घुसला तिथून पाण्याच्या धारा चालू झाल्या आणि सकाळपर्यंत तो कुंड हिरवट झाक असलेल्या नितळ पाण्याने तुडुंब भरला. सकाळपर्यंत ही सर्व वार्ता सगळीकडे पसरली. पंतही कुंडाजवळ आले पाणी इतके नितळ होते की तळापर्यंतचा भाग स्पष्ट दिसत होता. पंतांना तळाशी खुपसलेला त्रिशूळ दिसला आणि काही वेळातच टो अदृश्य झाला. पंतानीही मनात देवीचे आभार मानले. देवीची स्थापना करण्यात आली, आरती होताच मातेच्या जयजयकाराणे सारा परिसर दुमदुमून गेला."रत्नागिरी माता की जय.. रत्नागिरी माता की जय..". हेमाद्रीपंतानी देवीचे नाव "रत्नेश्वरी" ठेवले आणि किल्याचे नाव "रत्नागिरी" असे ठेवले. तेंव्हापासून आजपर्यंत ही देवी रत्नेश्वरी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.